Sinha Landga Ani Kolha Story In Marathi जनावरांचा राजा जो सिंह तो एकदा फार आजारी पडला. पुष्कळ औषधोपचार केले, पण काही गुण येईना. त्याच्या समाचारास सगळे पशु रोज येत असत, पण कोल्हा मात्र येत नसे कोल्हयाचे व लांडग्याचे वैर होते.
सिंह लांडगा आणि कोल्हा – बोधकथा Sinha Landga Ani Kolha Story In Marathi
लांडग्याने सिंहास सांगितले की, ‘महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात हजर राहात नाही, यावरून तो आपल्या विरुद्ध काहीतरी कारस्थान करीत असावा, असे मला वाटते.’ हे भाषण ऐकून सिंहास कोल्हयाविषयी संशय आला व त्याने त्यास ताबडतोब बोलावून आणण्यासाठी एका पशूस पाठविले. हुकुमाप्रमाणे कोल्हा दरबारात येऊन हजर होताच सिंह त्यास म्हणतो, ‘काय रे, मी इतका आजारी असता माझ्या समाचारास तू मुळीच येत नाहीस, याचे कारण काय बरे ?’ कोल्हा उत्तर करतो, ‘महाराज, आपल्यासाठी एकदा चांगलासा वैदय मी पहात होतो.
शेवटी कालच एका मोठया वैदयाची व माझी गाठ पडली; त्यास मी आपल्या प्रकृतीसंबंधीने विचारले, तेव्हा त्याने सांगितले की, नुकतेच काढलेले लांडग्याचे ओले कातडे पांघरावयास घेतले असता, हा रोग बरा होईल; याशिवाय अन्य उपाय नाही.’ कोल्हयाचे हे भाषण सिंहास खरे वाटले व त्याने कातडयासाठी लांडग्याचा तात्काळ प्राण घेतला.
तात्पर्य:- दुसऱ्याचा नाश व्हावा अशी इच्छा धारण करणारे लोक बहुधा स्वतःच नाश पावतात.